विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील उच्चांकी साखर निर्यात पुरस्कार जाहीर-
बेंबळे। प्रतिनिधी।
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि नवी दिल्ली या संस्थेकडून सन २०२०-२१ हंगामात केलेल्या उच्चांकी साखर निर्यातीसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले कारखान्याने १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये युनिट नं.१ पिंपळनेर येथील ७७ हजार ५५३ मे. टन व युनिट नं.२ येथील ४ हजार ६३९ मे. टन अशी एकूण ८२ हजार १९२ मे. टन साखरेची निर्यात केलेली आहे. निर्यात करण्यात आलेल्या साखरे मध्ये ६ ९ हजार ७ ४ ५ मे. टन कच्ची साखर व १२ हजार ४४६ मे. टन पांढरी साखरेचा समावेश आहे. कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी सर्व संचालक मंडळ, सभासद,ऊस पुरवठादार,तोडणी मजूर, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, युनिट २ चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. सदर पुरस्काराचे वितरण १६ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.
कारखान्यास यापूर्वी चाचणी व प्रथम गळीत हंगाम २००१-०२ मध्ये विक्रमी ऊस गळीताबद्दल प्रथम क्रमांक, सन २००७-०८ मध्ये उत्तम आर्थिक व्यवस्थापनाबद्दल द्वितीय क्रमांक, २००३-०४, २००५-०६ व २००९-१० मध्ये उत्तम तांत्रिक कार्यक्षमता, सन २००६-०७ व २०१०-११ मध्ये सर्वोत्कृष्ट आसवनी,सन २०११-१२ मध्ये सर्वोत्कृष्ट उद्योजगता व उत्कृष्ट ऊस विकास, २०१२-१३मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स, सन २०१३-१४ मध्ये साखर निर्यात, सन २०१५ मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को. शुगर फॅक्टरी, सन २०१४-१५ मध्ये उच्चांकी ऊस गाळप, सन २०१५-१६ मध्ये साखर निर्यात,उत्तम तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट आसवनी, सन २०१६-१७ मध्ये साखर निर्यात,सन २०१७-१८ मध्ये उच्चांकी ऊस गाळप, उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन, सन २०१८ मध्ये को-ऑपरेटीव्ह मेरीट अॅवॉर्ड अशी राज्य व देशपातळीवरील एकूण २० पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गाळप क्षमता विस्तारवाढ, आसवनी विस्तारवाढ,को-जन विस्तारवाढ, युनिट २ खरेदी इत्यादी मुळे कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याची माहिती व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा