मोफत आरोग्य तपासणी शिबिर, व्यावसायिक मशीन वाटप व भव्य लकी ड्रॉ च्या आयोजनाने टेंभुर्णी जागतिक महिला दिन संपन्न
महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणार : सुरजाताई बोबडे
जिजाऊ ब्रिगेड व यशस्विनी महिला मंच टेंभुर्णी यांचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले च्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवमती सुरजा बोबडे, प्रसिद्ध उद्योजिका कमलाताई परदेशी व जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी तसेच यशस्विनी महिला मंच बचत गट या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिन विविध उपक्रमांतून संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो जिजाऊ ब्रिगेड टेंभुर्णी व यशस्विनी महिला मंच टेंभुर्णी यांच्या वतीने महिलांचे आरोग्य सदृढ व्हावे बदलत्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये व खर्चाला आळा बसावा या हेतूपोटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना स्वतःच्या पायावरती ठामपणे उभारता यावे स्वतः एक उद्योजिका व्यवसायिक म्हणून त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सध्या टेंभुर्णी आणि परिसरामध्ये महिलावर्ग मोठ्या प्रमाणात व्यावसायिकतेकडे वळत आहे.
अंबिका मसाले या व्यवसायाच्या प्रसिद्ध उद्योजिका कमलाताई परदेशी यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले. व्यावसायिकतेकडे वळण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना संधी उपलब्ध करून देऊन त्याला उद्योजकतेची जोड देत आधुनिक विकासाची कास धरली पाहिजे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आपणही समाजामध्ये उद्योजिका म्हणून मिरविले पाहिजे. याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांमध्ये चेतना निर्माण करणारे प्रबोधन यावेळी पार पडले.
आपल्या भाषणातून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती सुरजा बोबडे बोलताना म्हणाल्या की, महिलांचे सबलीकरण, व्यवसायिकतेचे महत्व, आर्थिकदृष्ट्या संपन्न, त्यांचे आरोग्य व वैयक्तिक जीवमान उंचवावे याकरिता आम्ही नेहमी कटिबद्ध असतो. यशस्विनी महिला मंच बचत गटाच्या माध्यमातून महिपांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. शासकीय योजनांचे लाभ घेण्याविषयीच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. यादरम्यान नियोजित लाभार्थी महिलांना कापूर, अगरबत्ती मशीन, पापड, मसाले इ. यांत्रिक मशीनचे वाटप यावेळी केले गेले.
त्याबरोबरच बदलत्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये नेत्र तपासणी, रक्तदाब व शुगर तपासणी, संपूर्ण बॉडी चेकअप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांचे मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया अशा विविध तपासण्या घेण्यात आल्या. जवळपास हजारो महिलांनी याचा लाभ घेतला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या मुलांवरती आदर्श संस्कार करणाऱ्या महिलांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ताणतणावाच्या वातावरणात विरंगुळा म्हणून महिलांसाठी खास लकी ड्रॉ चेही आयोजन केले होते. निवड झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू देण्यात आल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व यशस्विनी महिला मंच बचत गट टेंभुर्णी आणि श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा