स्नेहल जगतापांच्या शिवबंधनानंतर रायगडातील राजकीय समीकरणे बदलणार !
महाड (मिलिंद माने). काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या व महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचा सहा मे रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत होणाऱ्या जाहीर प्रवेशाने रायगडातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाड मधील चांदे क्रीडांगणावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत स्नेहल जगताप व माणिकराव यांचे बंधू हनुमंत जगताप व महाड तालुक्यातील असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी उद्धव साहेबांच्या हस्ते शिवबंधन बांधल्यानंतर. 194 महाड विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात होणार आहे
महाड विधानसभा मतदारसंघातून महिला राजची सुरुवात होणार असल्याने त्याचे लोण रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी 194 महाड ,193 श्रीवर्धन, 192 अलिबाग ,व 191 पेण या चार विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत महिला च उमेदवार असतील असे संकेत रायगडच्या राजकारणातून प्राप्त होत आहेत
रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ व दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे यापैकी केवळ 192 अलिबाग विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षीताई पाटील यांच्यानंतर 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती तटकरे यांनी महिला म्हणून आमदार होण्याचा मान रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत मिळवला आहे त्याच पद्धतीने 194 महाड विधानसभा मतदारसंघात संभाव्य विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवार म्हणून निवडून येण्याचा मान स्नेहल जगताप या मिळवणार असल्याचे संकेत सहा मे च्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर स्पष्ट होणार आहे
रायगड जिल्ह्यातून सन 1995 ते 1999 या काळात शेतकरी कामगार पक्षाकडून मीनाक्षी प्रभाकर पाटील यांनी 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते तसेच 1999 ते 2004 या काळात 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मीनाक्षी प्रभाकर पाटील यांनी प्रतिनिधित्व केले होते त्यानंतर सन 2009 ते 2014 या काळात पुन्हा एकदा मीनाक्षी प्रभाकर पाटील यांना पुन्हा अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्याच्या 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती सुनील तटकरे यांना महिला उमेदवार म्हणून निवडून येण्याचा मान प्राप्त झाला. रायगड जिल्ह्यातील पाटील व तटकरे या दोन महिला सोडल्यास आज पर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात एकही महिला आमदार झालेली नाही
सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी 194 महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप कामत या निवडणूक लढणार असून त्यांच्या विरोधात विद्यमान शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले या महाड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असतील असे संकेत प्राप्त होत आहेत
रायगड जिल्ह्यातील 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आदिती सुनील तटकरे या पुन्हा एकदा महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील त्याचबरोबर 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघातून चित्रलेखा पाटील या शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवार असण्याची शक्यता असली तरी पाटील घराण्यातील संदोपसूंदी पाहता आस्वाद पाटील हे माजी आमदार मीनाक्षी प्रभाकर पाटील यांचे सुपुत्र हे निवडणूक लढू शकतात
191 पेण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवीशेठ पाटील हे आमदार जरी असले तरी शेतकरी कामगार पक्षाकडून भाजपा प्रवेश केलेले धैर्यशील पाटील हे भाजपाचेच रायगड लोकसभा मतदार संघाचे भावी उमेदवार असतील असे संकेत आहेत मात्र त्यांच्या पत्नी नीलिमा धैर्यशील पाटील या रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व माजी बांधकाम सभापती ही पद त्यांनी भूषवले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर भाजपाकडून उमेदवार बदल झाला तर नीलिमा धैर्यशील पाटील या पेण विधानसभा मतदारसंघातून महिला उमेदवार म्हणून भाजपाकडून प्रतिनिधित्व करू शकतील त्यामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत सात विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात महिलाराज येण्याची शक्यता अधिक असून त्याची सुरुवात स्नेहल माणिकराव जगताप यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेशाने सुरुवात होणार असल्याचे संकेत 194 महाड विधानसभा मतदारसंघातील जनतेकडून प्राप्त होत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा