ग्रीन व्हिलेज च्या मोफत आरोग्य शिबिरात 276 रुग्णांची तपासणी...
बेंबळे। प्रतिनिधी
बेंबळे येथे युवकांनी स्थापन केलेल्या आणि विधायक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ग्रीन व्हिलेज फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथील ट्यूलीप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विद्यमाने येथील विमलेश्वर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात सर्व वयोगटातील एकूण 276 रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये गुडघा शस्त्रक्रिया विषयी अमेरिकन फेलोशिप प्राप्त अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत निकम तसेच दुसरे अस्थिरोग तज्ञ डॉ, विलास सुरवसे हृदयरोग तज्ञ डॉ. सुनील पवार, टेंभुर्णीचे डॉ. गायकवाड डेंटिस्ट डॉ. अमोल भोसले , बेंबळे येथील यशवंत क्लिनिकचे प्रमुख डॉ. यशवंत दगडे तसेच डॉ.घोगरे डॉ.विश्वास व सिस्टर कोरे यांनी रुग्णांच्या तपासणी व उपचार करण्यासाठी सहभाग घेतला . या मोफत आरोग्य शिबिरात लहान बालके, युवक-युवती, प्रौढ स्त्री - पुरुष तसेच वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून तसेच योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचेवर ट्यूलिप हॉस्पिटल पंढरपूरच्या वतीने मोफत औषधोपचार करण्यात आले. या उपक्रमासाठी ग्रीन व्हिलेज फाउंडेशनचे क्रियाशील युवक कार्यकर्ते , विमलेश्वर विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले . या उपक्रमाबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार संस्थेचे संस्थापक कार्यवाह माजी मुख्याध्यापक गोविंद भोसले व इतर संचालकांनी शिबिरासाठी सेवा दिलेल्या सर्व डॉक्टरांना धन्यवाद दिले व ग्रीन व्हिलेज फाउंडेशनच्या युवक कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा