बेंबळे येथील श्री विमलेश्वराच्या यात्रेस रामनवमीपासून प्रारंभ :: भव्य छबिना, कुस्त्यांचा आखाडा व बैलगाडा शर्यतींचे आयोजन
बेंबळे /प्रतिनिधी.
कावडकाठी व विमलेश्वराचा फोटो.
मागील 900 वर्षापासूनची परंपरा असलेल्या बेंबळे येथील जागृत ग्रामदैवत श्री विमलेश्वराच्या यात्रेस बुधवारी 17 एप्रिल , रामनवमीपासून प्रारंभ होत आहे ही यात्रा पाच दिवस चालणार आहे .
बेंबळे नगरीस ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असून गावच्या पश्चिमेस दक्षिणमुखवाहीनी भीमा नदीचे विशाल पात्र आहे. या ठिकाणी भगवान शंकरांनी स्नान करून आपल्या सऱ्या (जटा) परिसरातील सात ठिकाणी आपटल्या व काळेश्वर, उत्तरेश्वर, सिद्धेश्वर, बनेश्वर, धारेश्वर, आमरेश्वर व विमलेश्वर अशा सात ठिकाणी शिवलिंग प्रगटले म्हणून या नगरीस सात सर्यांची पांढर असे संबोधले जाते, विमलेश्वर हे ग्रामदैवत गावच्या मध्यभागी आहे. द्रौपदीसह पांडवांनी व तसेच अनेक तपस्वी साधूमुनींनी या ठिकाणी वास्तव्य केल्याच्या खुणा दिसून येतात, संत कुर्मदास महाराजांच्या ग्रंथात बेंबळे नगरी विषयी या सर्व बाबींचा उल्लेख
आजही दिसून येतो.
श्री विमलेश्वराची कावड काठी 21 फूट उंच असून विविध रंगाच्या रेशमी वस्त्रांनी सजलेली आहे. कावड काठीच्या खालील बाजूस मिश्र धातूंचे मोठे दोन हांडे असून ते इ.स.1270 साली तयार केले असल्याच्या नोंदी त्यावर दिसून येतात, तसेच या हंड्यावर आप्पाजी बिन, विठुजी पाटील, दौलत बिन ,गोविंद जोशी, कुमाभाई ,बाबाजी सोनार, बापू मुलांणी, गेणू सुतार, नारायण पाटील ,महम्मद तांबोळी, रामजी सुतार व सदाशिव मोटे या पूर्वजांनी इ. स. 1270 च्या श्रावण पंचवीस हे हांडे तयार करुन घेतले असल्याचा उल्लेख दिसून येतो. या सर्वांचे अकरावे वंशज आजही कावडकाठीची परंपरा चालवत आहेत .या कावडकाठीस श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पहिल्या मानांच्या कांही काठ्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
सालाबाद प्रमाणे बुधवार दिनांक 17 एप्रिल रामनवमीच्या दिवशी विमलेश्वराची कावड काठी दुपारी एक वाजता शिंगणापूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवणार आहे, काठी सोबत पायी चालत जाणारे शेकडो तरुण, अनेक बैलगाड्या व ट्रॅक्टर जाणारआहेत. बेंबळे नगरीतून वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने निघणाऱ्या कावडकाठीवर यात्रा कमिटी व स्वामी समर्थ भक्त मंडळांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात येणार असून अन्नछत्र मंडळाच्या वतीने हजारो भाविकांना थंड सरबत वाटप करण्यात येणार आहे .खांद्यावरून वाहून नेलेली ही कावड काठी गुरुवारी 18 एप्रिल रोजी दुपारीशिंगणापूरला पोहोचणार आहे .शुक्रवारी 19 एप्रिल रोजी एकादशीच्या पहाटे शिंगणापूरच्या तलावातून कावडीचे दोन्ही हंडे पाण्याने भरून घेऊन हर हर महादेवाच्या गजरात शेकडो पायऱ्या चढून कावडकाठी मंदिरात पोहोचणार असून शंभू महादेवास पाच प्रदक्षिणा घालून मोठ्या हंड्यातील पाण्याने सर्वत्र जलाभिषेक ( धार घालणे) कार्यक्रम संपन्न होणार आहे व सकाळी कावडकाठी परत पायी चालत निघून सायंकाळपर्यंत बेंबळे येथे भीमा नदीच्या वाळवंटात येऊन विसावणार आहे. एकादशीच्या याच रात्री विमलेश्वर मंदिरात लक्ष्मण शक्ती-मुक्ती सोहळा संपन्न होत आहे. रामायण वाचन व लक्ष्मण शक्तीचे बेंबळे येथील चालु 70 वे वर्ष आहे, सर्व उपस्थित भाविकांना सकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते . शनिवारी 20 एप्रिल रोजी द्वादशी निमित्त श्री विमलेश्वरास महा रुद्राभिषेक होणार असून त्याचे पौरोहित्य संजूदेव जोशी व ऋषिकेश जोशी हे करणार आहेत. दुपारी गावातून कावड काठ्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे, याच दिवशी रात्री बारानंतर श्री विमलेश्वराच्या पालखी मिरवणूक छबिना निघणार आहे, हलग्या ,बँड, लेझीम इतर अनेक वाद्यांचे गजर, दारू कामाची आतषबाजी व हजारो भाविकांच्या हर हर महादेव अशा जय जय कारात हा छबिना पहाटे पाच वाजेपर्यंत नगर प्रदक्षिणा करून मंदिरात येतो. रविवारी 21 एप्रिल रोजी सकाळी भेदिक गाणी व दुपारी भव्य मैदानी कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे, यावेळी अनेक ठिकाणचे नामांकित पैलवान उपस्थित असतात व लाखो रुपयांची बक्षिसे पैलवानांना दिली जातात. यात्रेनिमित्त पहिल्यांदाच सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी नऊ वाजलेपासून बनवस्ती येथे कॅनॉल नजीक बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी एक लाख 16 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विमलेश्वर अन्नछत्र मंडळ व स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने यात्रा काळात येणाऱ्या किमान दहा ते बारा हजार भाविकांना अन्नदानाचा करण्यात येणार आहे मागील तेरा वर्षापासून अन्नदानाची परंपरा कायम आहे. यात्राप्रसंगी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येतो बेंबळे ग्रामपंचायतीतर्फे गावात स्वच्छता वीज व पाणीपुरवठा तसेच बाजारपेठेतील नियोजन योग्य प्रकारे करण्यात येत आहे. श्री विमलेश्वर यात्रा कमिटी यात्रा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील दिसून येते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा