गळितास आलेल्या जळीत उसाची प्रति टन कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत देणार....
शिंदे कारखान्याच्या दोन्ही युनिटचे एकूण चार कोटी रुपये दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ...आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे ..प्रतिनिधी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याने सन 2023-24 गळीत हंगामामध्ये जळीत होवून गाळपास आलेल्या ऊसाचे बिलातून कारखाना धोरणानुसार कपात केलेली संपूर्ण रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतक-यांना परत करण्यात येणार असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2023-24 चा गळीत हंगाम नुकताच बंद झालेला आहे. या गळीत हंगामामध्ये दोन्ही युनिट कडे दि.01/11/2023 ते दि.06/04/2024 या कालावधीत ज्या ऊस पुरवठादारांचा ऊस शॉर्टसर्कीट, नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे जळीत होवून गळीतास आला आहे त्यांचे ऊसाचे बिलातून कारखाना धोरणाप्रमाणे प्रति टन रक्कम कपात करण्यात आली आहे. सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतक-यांना पिण्याचे पाणी, जनावरांचे चा-याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत आहे.अशा परिस्थितीमध्ये शेतक-यांना दिलासा देणेच्या दृष्टीने ऊस बिलातून कपात करण्यात आलेली जळीताची शंभर टक्के रक्कम ऊस पुरवठादारांना परत करण्यात येणार आहे. जळीत ऊसाची कपात रक्कम सभासद शेतक-यांना परत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. जळीत कपात रक्कमेमध्ये युनिट नं.1 पिंपळनेर येथील रू.3 कोटी 94 हजार व युनिट नं.2 करकंब येथील रू.90 लाख 29 हजार अशा एकूण रू.3 कोटी 91 लाख रक्कमेचा समावेश आहे. सदर जळीत ऊसाची कपात रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात येत्या दोन ते चार दिवसात वर्ग करण्यात येणार आहे. कारखाना व्यवस्थापनाने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांचे हित जोपासणेचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही युनिट कडील सन 2023-24 चा गळीत हंगामातील गाळपाचे उद्दिष्ठ पार पाडण्यासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांनी सहकार्य केले असून पुढील सन 2024-25 गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे द्यावेत असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे जनरल मॅनेजर सुहास यादव, संचालक व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा